राहुरी: तालुक्यातील निंभेरे-तुळापूर परिसरात दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा सलग दोन दिवस मोटारसायकलवर पाठलाग करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. त्याबाबत माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करत काही काळ पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी दररोज सायकलवरून शाळेत ये-जा करत होती.
दि. १४ जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास ती मैत्रिणीसह घरी जात होती. त्या वेळी आरोपी आरमान जब्बार शेख (रा. तुळापूर, ता. राहुरी) याने मोटारसायकलवरून तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.
दुसऱ्या दिवशी, दि. १५ जुलै रोजीही आरोपीने तिचा पाठलाग केला. यावेळी रस्त्यात तिचा हात धरून विनयभंग केला. तसेच मोबाईल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी देत, ‘ही चिठ्ठी घे, नाही घेतली तर तुला मारीन,’ अशी धमकी दिली. भीतीपोटी विद्यार्थिनीने ती चिठ्ठी स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घरी गेल्यावर विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. नंतर मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. ते समजताच तुळापूर व निंभेरे परिसरातील शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमले.
यावेळी मनोहर महाराज सिनारे, माजी सभापती भीमराज हारदे, तुळापूरचे सरपंच दादासाहेब हारदे, अमोल हारदे, निंभेरीचे सरपंच शांताराम सिनारे, आकाश महाराज हारदे, शरद विधाते, कामगार पोलिस पाटील बाळकृष्ण हारदे व सचिव माधव हारदे यांनी, तीव्र संतप्त भावना व्यक्त केली. आरोपी आरमान जब्बार शेख याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


