राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यता आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावासा पाठिंबा असल्याचे सूचवले आहे. त्यामुळे, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केलीय
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ कमी असतानाही ज्येष्ठ नेते म्हणून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या नावाची घोषणा केली, तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.
राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या ३७ जागांपैकी महाराष्ट्रातील तब्बल ७ जागा आहेत. राज्यसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच आज भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून एकाही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आल्या असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेसाठी भाजपाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाविकास आघाडीकडून अद्याप एकाही नावाची घोषणा करण्यात आली नाही. काँग्रेसचं नेमकं काय ठरलंय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही राज्यसभेच्या जागेचा आग्रह धरला होता.
राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी आणि विधानपरिषदेची जागा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी आमची मागणी होती. ही मागणी आम्ही पक्षाच्या हायकमांडकडेही मांडली होती”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.“पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काही नेत्यांनी दिल्लीत हायकमांडशी संपर्क केला, तसेच उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क केला आणि त्यांची भूमिका मांडली. तसेच आमच्या प्रदेशाध्यक्षांशी देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. त्यामुळे आमच्या पक्षाच्या हायकमांडने कदाचित शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा. आताच आम्हाला आमच्या पक्षाच्या हायकमांडकडून फोन आला आणि त्यांच्याकडून सांगण्यात आलं की, शरद पवार यांना पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे असं त्यांचं एकमत झालं. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील. मात्र, ही घोषणा महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्रित जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत हा अंतिम निर्णय आहे असं समजण्याचं कारण नाही”, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.


