अहिल्यानगर – शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 42 वर्षीय महिलेवर चहातून गुंगीचे औषध देत अत्याचार, छळ आणि लाखोंच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुल नारायण मेरगु (रा. कुंभार गल्ली, तोफखाना, अहिल्यानगर) याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, ही घटना 19 ऑगस्ट 2024 पासून सुरू असून ती जाधव पेट्रोल पंपामागील एका जागी घडली. संशयित आरोपीने फिर्यादी महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेत, तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर चहामध्ये गुंगीकारक औषध देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्या प्रसंगाचे नग्न छायाचित्रे काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करत, वारंवार छळ केला. त्यानंतर संशयित आरोपीने या छायाचित्रांचा वापर करून ते सोशल मिडियावर (फेसबुक व इन्स्टाग्राम) व्हायरल करण्याची धमकी दिली.
या भीतीपोटी महिलेने वेगवेगळ्या वेळेस संशयित आरोपीला एकूण 14 लाख 74 हजार 800 रुपये दिल्याची माहिती आहे. पीडित महिलेने अखेर हा छळ सहन न होता शुक्रवारी (11 जुलै) रात्री 8:30 वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.


