Tuesday, November 11, 2025

छत्रपती संभाजीनगर – नगर – शिरूर – पुणे या महामार्गाचे सहा लेन सिमेंट काँक्रीटीकरण ;खा. लंकेची मंत्री नितीन गडकरी यांची भेट

रस्ते विकासासाठी खासदार नीलेश लंके यांची केंद्रस्तरावर ठोस मागणी

नागरिकांच्या सुरक्षिततेला व औद्योगिक विकासाला चालना देणार

अहिल्यानगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकास, अपघात नियंत्रण आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांचे निरसन तसेच प्रादेशिक औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ७५३-एफ सहा लेन करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर – शिरूर – पुणे या महामार्गाचे सहा लेन सिमेंट काँक्रीटीकरण करून प्रवास सुरक्षित व जलद करण्याचा प्रस्ताव खासदार लंके यांनी केंद्रापुढे मांडला आहे. शिर्डी, शनी शिंगणापूर, नेवासा यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसह अहमदनगर–पुणे औद्योगिक पट्ट्याचा विकास यामुळे वेगाने होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोठला–शेंडी उड्डाणपुलाने नगरकरांना दिलासा

नगर शहरातील कोठला–शेंडी मार्गावर गंभीर वाहतूक कोंडी व अपघातांची समस्या ओढवली असून, येथे उड्डाणपुल उभारण्याची तातडीची गरज असल्याचे खासदार लंके यांनी नमूद केले. या पुलामुळे वाहतूक कोंडी कायमची सुटेल आणि शहराची प्रतिमा अधिक भव्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सूरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तातडीने सुरू व्हावा

अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या सूरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या १०० किमी मार्गासाठी जमीन अधिग्रहण पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे खासदारांनी पत्रात नमूद केले. “हा प्रकल्प सुरू झाल्यास औद्योगिक गुंतवणूक, कृषिउत्पादन निर्यात आणि साखर–इथेनॉल उद्योगाला मोठी चालना मिळेल,” असे ते म्हणाले.

४) राष्ट्रीय महामार्ग १६० चे रुंदीकरण गरजेचे

सावलीविहीर ते नगर बायपास (एनएच-१६०) रस्त्यावर गेल्या काही वर्षांत ४०० हून अधिक अपघाती मृत्यू झाल्याची गंभीर बाब अधोरेखित करत खासदार लंके यांनी या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी उपोषण करून केल्यानंतर प्रशासनाने आश्वासन दिले मात्र काम थांबलेलेच असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

खासदार लंके यांची भूमिका

“माझ्या मतदारसंघातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी, अपघात रोखण्यासाठी आणि प्रदेशाच्या विकासासाठी हे प्रकल्प विलंब न होता सुरू व्हावेत, अशी माझी ठाम भूमिका आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात दर्जेदार रस्ते झाले, तशीच गती नगर जिल्ह्यालाही मिळावी, ही जनतेची अपेक्षा आहे,” असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles