Friday, February 27, 2026

बारावीच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला; नगर शहरातील घटना…

अहिल्यानगर -येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात 12 वीच्या पेपरसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेत मुन्सिपल कॉलनी, सिध्दार्थनगर येथील 17 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन मुलांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जखमी मुलाने दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी हा 12 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून बुधवारी (25 फेब्रुवारी) दुपारी आपल्या मित्रासोबत परीक्षेचा सिट नंबर व बेंच पाहण्यासाठी महाविद्यालयात गेला होता. यावेळी त्याच महाविद्यालयातील एका ओळखीच्या मुलाने दुचाकीवरून येत फिर्यादीला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.संतापलेल्या त्या मुलाने आपल्या बॅगेतून लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसर्‍या एका मुलाने फिर्यादीला पाठीमागून धरून ठेवले होते. दोघांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. जखमी फिर्यादीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याच्या मित्राने तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मारहाण करणार्‍या संशयित मुलांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles