तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर
100 गुण अन् निगेटिव्ह मार्किंग; ‘असा’ असेल पेपर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क संयुक्त पूर्व परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या 1539 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा सविस्तर अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत जाहीर केली आहे.
महसूल व वन विभागातील या पदांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क संयुक्त परीक्षांद्वारे होणार आहे. यंदा 1539 पदांसाठी ही प्रक्रिया पार पडणार असून प्रथमच तलाठी पदाचा समावेश गट-क संयुक्त परीक्षेत करण्यात आला आहे.
परीक्षेची रचना
– एकूण गुण: 100
– प्रश्नसंख्या: 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
– कालावधी: 1 तास (60 मिनिटे)
– परीक्षा माध्यम: मराठी व इंग्रजी
– परीक्षेचा दर्जा: पदवी स्तर
– निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा केले जातील. उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह गुण लागू नाहीत.
निवड प्रक्रिया 2 टप्प्यात होणार आहे – संयुक्त पूर्व परीक्षा (100 गुण) आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा (400 गुण).
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम – 8 विषय
100 वस्तुनिष्ठ प्रश्न खालील 8 घटकांवर विचारले जातील:
1. इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
2. भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास: पृथ्वी, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे
3. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय धोरण. शासकीय अर्थव्यवस्था: अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण
4. चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील महत्वाच्या घडामोडी
5. राज्यशास्त्र – राज्यघटना आणि राज्य कारभाराशी संबंधित मूलभूत घटक
6. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र
7. अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी मूलभूत घटक
8. बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावणारे प्रश्न
तलाठी पदासाठी इच्छुक उमेदवारांनी वरील अभ्यासक्रमानुसार तयारी करावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.


