TET पेपरफुटीमध्ये पोलिसांचा धक्कादायक खुलासा; तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांत पेपरची ठरली किंमत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून पुढे ढकलण्यात आल्यानंतर या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेचा पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकला जाणार होता, अशी धक्कादायक माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना भिवंडीतील कोनगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, उद्या २८ जून रोजी राज्यभर एकूण १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. नुकत्याच देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर परिषदेने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र, परीक्षा होण्याच्या काही तासांपूर्वीच मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. याची माहिती देण्यासाठी भिवंडी येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. प्राथमिक तपासात त्यांनी टीईटीची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचे समोर आले असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले. या कारवाईदरम्यान संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, ती कोणाकडून आरोपींपर्यंत पोहोचली आणि ती नेमकी कोणाला विकली जाणार होती, याचा सध्या सखोल तपास सुरू असल्याचे दुधे यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी २० पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून, विविध राज्यांमध्ये तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असून, तो हाती लागल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

याशिवाय आरोपींचे कोचिंग क्लासेस, परीक्षा एजंट किंवा इतर कोणत्याही रॅकेटशी संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे. प्रश्नपत्रिका आणखी कुठे पोहोचली आहे का, किती उमेदवारांपर्यंत ती पोहोचली आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला भिवंडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आरोपींकडे असलेल्या मजकुराशी जुळत असल्याचे प्राथमिक पडताळणीत समोर आले. त्यानंतर परीक्षेची पारदर्शकता कायम राखण्यासाठी २८ जूनची टीईटी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणानंतरही परीक्षा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता टीईटी पेपरफुटीमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles