अहिल्यानगर – शहरातील तोफखाना आणि एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना तब्बल एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक हत्यारे बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सखोल चौकशीअंती आशिष ऊर्फ पप्पू अंतोन पाटोळे (२२, रा. नागापूर), अमोल गोरख आव्हाड (२४, रा. काकासाहेब म्हस्के रोड) आणि सुरज ऊर्फ खंडू अरविंद भिंगारदिवे (२२, रा. नागापूर) या तिघांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
—————————————————————————————————————————————————————–
टोलनाक्याजवळ कोयता घेऊन दहशत करणारे दोघे जण पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर – शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ हातात लोखंडी धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (ता. १६) ताब्यात घेतले. या कारवाईत एका संशयिताकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. प्रितिम भाऊसाहेब लाळगे (वय २४, रा. दांगटमळा, चेतना कॉलनी, नवनागापूर, वडगाव गुप्ता, ता. जि. अहिल्यानगर) आणि नकुल विठ्ठल पवार (वय २६, रा. जेऊर बायजाबाई, न्हावी गल्ली, ता. जि. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ दोघेजण हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यापैकी एका व्यक्तीकडून लोखंडी धारदार कोयता मिळून आला. पोलिसांनी हा कोयता जप्त केला असून, दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.


