जिल्हा परिषद सदस्यासह तिघांना बेदम मारहाण ; नगर तालुक्यात 16 जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर-स्वस्तात सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा व्यावसायिक अविनाश अनिल नलावडे (वय 34, रा. सणसवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) यांना अहिल्यानगर जिल्ह्यात बोलावून त्यांच्यासह साथीदारांवर जीवघेणा हल्ला करत तब्बल 52 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्ल्यात जखमी झालेले नलावडे यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 14 ते 16 जणांविरूध्द फसवणूक, दरोडा कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजु मोहिते, अक्षय मोहिते (दोघे रा. नांदेड), बापु पवार व त्याचा भाऊ (नाव माहिती नाही, दोघे रा. हिगोंली) तसेच अनोळखी 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी अविनाश नलावडे हे बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करत असून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या व्यवसायात काम करणारे राजू मोहिते व त्याचा भाऊ अक्षय मोहिते हे गेल्या चार वर्षांपासून डबर बांधकामाचे काम करत होते.

फिर्यादीनुसार, 25 मे रोजी पुणे येथे जात असताना राजू मोहिते याने बापू पवार नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली. त्यावेळी बापू पवार याने स्वतःकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे सांगून अर्धा किलो वजनाचा सोन्याचा तुकडा दाखविला. त्यातील काही कॉईन घेऊन नलावडे यांनी माणगाव येथील परिचित सोनाराकडून तपासणी केली असता ते खरे सोने असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संशयित आरोपींनी त्यांच्या ताब्यात सुमारे चार किलो सोने असल्याचे सांगून ते प्रतिकिलो 25 लाख रूपयांना विकण्याची तयारी दर्शविली. या व्यवहारासाठी आरोपींनी वारंवार संपर्क साधत नलावडे यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले.

सुरूवातीला हिंगोली, नंतर चाकण (जि. पुणे) आणि अखेरीस अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा (ता. पारनेर) व स्टेशन सारोळा (ता. अहिल्यानगर) परिसरात येण्यास सांगण्यात आले. गुरूवारी (4 जून) नलावडे हे 46 लाख रूपये रोख रक्कम, सोनार सोनाराम माळी, चालक प्रकाश जंगम आणि अन्य सहकार्‍यांसह दोन वाहनांतून चाकणकडे रवाना झाले. मात्र आरोपींनी फोनवरून वारंवार ठिकाण बदलत त्यांना सुपा, रायतळे आणि नंतर स्टेशन सारोळा परिसरात बोलावले. यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे नलावडे यांना बुरूडगाव (ता. अहिल्यानगर) शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील निर्जन रस्त्यावर नेण्यात आले. तेथे बापू पवार याने कथित सोने दाखविले. त्यातील काही कॉईन सोनार तपासत असतानाच आरोपी राजू मोहिते याने अचानक शिट्टी वाजवली.

शिट्टीचा इशारा मिळताच उसाच्या शेतातून अक्षय मोहितेसह 10 ते 12 जणांचा टोळके बाहेर आले. आरोपींनी नलावडे यांना वाहनातून ओढून बाहेर काढले. अक्षय मोहिते याने लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर वार केले. इतर आरोपींनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. चालक प्रकाश जंगम आणि सोनार सोनाराम माळी यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी वाहनातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. आरोपींनी 46 लाख रूपये रोख रक्कम, साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चेन, एक लाखाचे महाकालीचे लॉकेट, अडीच तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 52 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज लुटला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles