शेवगाव तालुक्यातील तीन युवकांचा अपघातात मृत्यू कन्नड घाटातील दुर्दैवी घटना
शेवगाव : प्रतिनिधी संदीप देहाडराय- चाळीसगाव रस्त्यावरील कन्नड घाटात झालेल्या अपघातात शेवगावमधील तरुणांचा मृत्यू
शेवगाव,ता.८:छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रस्त्यावरील कन्नड घाटात बुधवार ता.७ रोजी रात्री उशिरा झालेल्या मोटार अपघातात शेवगाव मधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ,घनःश्याम रामहरी पिसोटे (वय-३०)रा.तळणी ता.शेवगाव, शेखर रमश धुरपते (वय-३१ हल्ली रा. शेवगाव ) तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय-२७ – जळगाव ता.गेवराई जि बीड ) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.तर जखमींमध्ये योगेश तुकाराम सोनवणे (वय-२८),अक्षय शिवाजी गिरे (वय-२५), ज्ञानेश्वर कांता मोडे (वय-२५), तुषार रमेश घुगे (वय-२६,सर्व रा. शेवगाव)यांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव येथील रहिवासी असलेले सातही तरुण मध्य प्रदेशातील उज्जैनला धार्मिक सहलीवर निघाले होते. बुधवारी रात्री उशिरा चाळीसगावपासून जवळच असलेल्या कन्नड घाटात घातक वळणावर अचानक नियंत्रण सुटल्याने त्यांच्या मोटारीचा भीषण अपघात झाला.या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला,ते चार तरुण गंभीर झाले.अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.तर पंचनामा करुन तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. अपघातात मोटारीचा पूर्ण चक्काचुर झाला आहे. अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे.या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेगासह रस्त्याची परिस्थिती अथवा तांत्रिक बिघाड यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज गुरुवार ता.८ रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान घनशाम पिसोटे ( तळणी शेवगाव), शेखर धुरपते ( मुळगाव – जामगाव पारनेर) तर तुकाराम अंभोरे ( मुळगाव जळगाव ता.गेवराई ) येथे शोकाकूल वातावरणात करण्यात आले.
दुबई येथे नोकरीस असलेला तुकाराम अंभोरे स्वत:च्या लग्नासाठी सध्या जळगाव ता. गेवराई या मुळगावी सुट्टीवर आला होता. आखातवाडे (ता.शेवगाव) येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेला हा तरुण शेवगाव येथील मित्रांसमवेत उज्जैनला देवदर्शनासाठी जात असतांनाच त्याचे अपघातात निधन झाले. त्याच्यासह दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने शेवगाव शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


