जिल्ह्यात तूर खरेदीस प्रारंभ
१० खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू
अहिल्यानगर, : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, संबंधित केंद्रांवर शेतकरी नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली आहे.
हंगाम २०२४-२५ करिता तुरीचा हमीभाव प्रति क्विंटल ८ हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. शेतकरी नोंदणीला दि. २४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, खरेदी कालावधी दि. ९ फेब्रुवारी ते दि. ९ मे २०२६ असा राहणार आहे.
तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील खालील १० केंद्रांवर नोंदणी करण्यात येत आहे. यामध्ये शेवगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (शेवगाव), जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, पाथर्डी (मार्केट यार्ड, पाथर्डी), श्रीदत्त पणन सहकारी संस्था, श्रीगोंदा (घारगाव), रियल ॲग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (घुटेवाडी), जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (मांडवगण), राहुरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (राहुरी), पारनेर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ (पारनेर), बहादराबाद विविध कार्यकारी सोसायटी, कोपरगाव (रांजणगाव देशमुख), चैतन्य कानिफनाथ कृषी फळे प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (खर्डा) आणि पुण्यश्लोक कृषी पणन प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (पिंपरखेड) यांचा समावेश आहे.
सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून नोंदणीसाठी आधारकार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची प्रत (खाते क्रमांक हस्तलिखित नसलेला), चालू वर्षाचा ७/१२ व ८-अ उतारा, तूर पिकाची ऑनलाइन नोंद आणि चालू मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
शेतकऱ्यांनी चालू हंगामातील सर्वसाधारण सरासरी दर्जाची तूर खरेदी केंद्रांवर आणावी. एन.सी.सी.एफ. यांनी निर्धारित केलेल्या निर्देशानुसार तुरीची तपासणी करण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदीसाठी बोलाविण्यात येईल. एसएमएसमध्ये नमूद केलेल्या तारखेलाच शेतमाल केंद्रावर आणणे बंधनकारक राहील, असेही आवाहन करण्यात आले आहे.


