Thursday, September 11, 2025

अहिल्यानगर नगर जिल्ह्यात बोगस शिक्षक- शिक्षकेतरांची 15 सप्टेंबरनंतर होणार पडताळणी

शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या लाडक्या शिक्षक व शिक्षकेतरांची तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे. यासाठी गेल्या 13 वर्षांत तयार झालेले शिक्षक, त्यांच्या सेवा काळातील विविध आदेश, रजा यासह अन्य कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित शिक्षकांना त्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यास सांगण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात 13 हजार 500 शिक्षकांपैकी 7 हजार 400 हून अधिक शिक्षकांंची ही माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. हे काम 60 टक्के झालेले आहे. उर्वरित 40 टक्के हे काम पुढील 15 दिवसात संपवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्यावतीने सांगण्यात आले.शाळेत शिकवत नाहीत, शाळेतील कामे करत नाहीत, तरीदेखील शासनाचा पगार घेणारे लाडके शिक्षक नागपुरात सापडल्यानंतर राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. नागपुरप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यात बोगस शिक्षक-शिक्षकेतर यांची खातरजमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी गेल्या 13 वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांच्या पदाला देण्यात आलेली मान्यता, नोकरी काळातील नोंदी, रजा आणि इतर आवश्यक कागदपत्रे तपासण्यात येणार आहे. यासाठी शासनाने मागील 13 वर्षांत नोकरीला लागलेल्यांची कागदपत्रे मागविली आहेत. कागदपत्रे पडताळणीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमली आहे. तत्पूर्वी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, उपसंचालकांकडून शिक्षक व शिक्षकेतर यांच्यावतीने ऑनलाईन करण्यात आलेल्या कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे.

राज्यातील एक लाख 23 हजार खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांसह सरकारी शाळांमधील सुमारे पावणे पाच लाखांहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कागदपत्रे शालार्थवर अपलोड केली जात आहेत. त्यासाठी आधी 30 ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, सणाच्या सुट्ट्यामुळे हा कालावधी 15 दिवसांनी म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, अपलोड होणारी माहिती मुख्याध्यापकांनी मुदतीत त्यांच्या शाळांमधील सर्व कर्मचार्‍यांची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतर पहिल्या टप्प्यात शैक्षणिक कागदपत्रांची (गुणपत्रिका आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रे) सत्यता पडताळली जाणार आहे. तसेच संबंधित कर्मचार्‍यांकडील शालार्थ आयडी खरा की खोटा याची तपासणी शिक्षण विभागाच्या ऑनलाइन प्रणालीवरून होईल.

तिसर्‍या टप्प्यात शिक्षकांच्या सेवा पुस्तकाची देखील सखोल तपासणी होणार आहे. त्यात नोकरी काळातील नोंदी, रजा आणि इतर आवश्यक कागदपत्रे पाहिली जातील. शेवटी आवश्यकतेनुसार विशेष समिती संशयास्पद कर्मचार्‍यांच्या शाळेत जाऊन त्यांच्या कामाची आणि उपस्थितीची पडताळणी करणार आहे. त्यातून तो शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी खरोखरच त्या शाळेत नोकरीला आहे की नाही हे समोर येणार आहे.एकूण शाळा-1.23 लाख असून या ठिकाणी कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या 4.84 लाख आहे. या शिक्षकांनी आपली कागदपत्रे शालार्थ आयडीवर अपलोड करण्याची मुदत 15 सप्टेंबर आहे. नगर जिल्ह्यात असे 13 हजार 500 शिक्षक व शिक्षकेतर आहेत. यापैकी आतापर्यंत 60 टक्के शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यात आलेली आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles