मुंबई : जेवढी चर्चा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरची होतेय, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा ही आज विधिमंडळात झालेल्या फोटोसेशनची होतेय. फोटोसेशनच्या निमित्तानं संगीत खुर्चीच पाहायला मिळाली. फोटोसेशनच्यावेळी अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे आले आणि एकनाथ शिंदेंची गोची झाल्याचं पाहायला मिळाले. कारण उद्धव ठाकरेंना बसण्यास ऑफर करण्यात आलेली खुर्ची ही शिंदेंच्या बाजूची होती. त्या दरम्यान जे काही घडत होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.
अंबादास दानवेंनी फोटोसेशनसाठी उद्धव ठाकरेंना बोलावलं. उद्धव ठाकरे आले, मात्र बसायचं कुठे असा प्रश्न होता. खरं तर योग हा शिंदेंच्या बाजूला बसण्याचा होता. मात्र जसजसे उद्धव ठाकरे पुढे येत होते. तसे एकनाथ शिंदे हे राम शिंदेंचा हात पकडून त्यांना खुणावत होते. नीलम गोऱ्हेंनी देखील उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या बाजूला बसण्यास सांगितलं. मात्र उद्धव ठाकरेंनी ते टाळलं, ते नीलम गोऱ्हेंच्या बाजूला बसले. विशेष म्हणजे यावेळी एकनाथ शिंदेंची देहबोली बरंच काही सांगून गेली. सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, हस्तांदोलन केलं. मात्र शिंदेंनी ठाकरेंशी नजरानजरही टाळली.
फोटोसेशनसाठी 10 खुर्च्या रांगेत सज्ज होत्या. वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा सर्वात पहिले पोहोचले. खुर्च्यांवरची नाव वाचून ते स्थानापन्न झाले. अजितदादांनंतर सगळे नेते हळूहळू फोटोसेशनसाठी गोळा होऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आले. त्यानंतर बावनकुळे, चंद्रकांतदादा, नीलम गोऱ्हेही आल्या. ज्यांना निरोप द्यायचा होता ते अंबादास दानवेही आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोटोसेशनला उपस्थित राहिलं पाहिजे अशी अंबादास दानवेंची तळमळ स्पष्ट दिसत होती. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. फडणवीसांच्या शेजारची खुर्ची एकनाथ शिंदेंची होती. मात्र फडणवीसांच्या आग्रहाखातर अंबादास दानवे तिथे बसले. मग एन्ट्री झाली विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची.
राहुल नार्वेकरांसाठी अंबादास दानवेंनी खुर्ची मोकळी करून दिली. थोडासा उशीर झालेल्या एकनाथ शिंदेंच्या धावपळीमुळे फोटोसेशनला संगीत खुर्चीचं स्वरूप प्राप्त झालं. त्यांनी राम शिंदेंच्या बाजूची खुर्ची पकडली.
नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, अजित पवार, अंबादास दानवे, अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील… फ्रेम रेडी होती, फोटो क्लिक होणार होता. मात्र त्याआधी अंबादास दानवेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले.उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वजन उभे राहिले. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि राम शिंदेही उभे राहिले. काही जणांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. पण प्रश्न होता की उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी कुणाच्या बाजूची खुर्ची द्यायची?
आधी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या खुर्चीच्या दिशेनं पुढे सरकत होते. तेवढ्यात राम शिंदेंचा हात पकडून खुणावताना एकनाथ शिंदेंना कॅमेऱ्यानं कैद केलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे… फूट नव्हे काही इंचाचं अंतर होतं. मात्र प्रत्यक्षात मनातला दुरावा पराकोटीचा होता.ज्यावेळी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याजवळ आले त्यावेळी शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र काहीसं टेन्शन असल्याचं दिसून आलं. शिंदेंनी आपल्या दोन्ही हाताने चश्मा नीट करत वेळ मारून नेली. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे मात्र बिनधास्त दिसत होते. त्यांनी शेजारी बसलेल्या नीलम गोऱ्हे यांच्याशी गप्पा मारल्या, भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला.


