अहिल्यानगर -एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण दत्तात्रय गुंड (रा. गुंड वस्ती, शेंडी, ता. जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित महिलेशी ओळख वाढवून, तिच्याशी जवळीक निर्माण केली. आपले तिच्यावर प्रेम असल्याचे भासवून आरोपीने गेल्या सहा महिन्यांत वेळोवेळी महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती आणि मुलांना मारून टाकण्याची धमकीही आरोपीने महिलेला दिली होती.
आरोपीच्या या सततच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडितेने राहत्या घरी जंतुनाशक औषध पिऊन जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रविण गुंड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोढे हे करीत आहेत.


