श्रीरामपूर येथील पाच तरुण आज दि. ११ सप्टेंबर रोजी राहुरी येथील मुळा डॅम येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. वाढदिवस साजरा केल्या नंतर पाच मित्रां पैकी शुभम घोडके हा २४ वर्षीय तरुण मुळा धरणाच्या पाण्यात एका तराफ्यावर बसून गेला असता तराफा पलटी झाल्याने तो पाण्यात बुडून मयत झाल्याचे दुर्दैवी घटना घडली.शुभम लक्ष्मण घोडके (वय २४ वर्षे, रा. सुतगीरणी, सम्राट नगर, ता. श्रीरामपूर) या तरुणाच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने ते पाच मित्र आज दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी राहुरी येथील मुळा डॅम येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. सायंकाळी ६ वाजे दरम्यान सदर पाच मित्रांनी मुळा धरण परिसरातील मरीआई खाई जवळ धरणाच्या कडेला वाढदिवस साजरा केला. तेव्हा शुभम घोडके हा थर्माकाॅलच्या तराफ्यावर बसून मुळा धरणाच्या पाण्यात काही अंतरावर गेला. तो तराफा अचानक पलटी झाला आणि शुभम हा परत किनार्यावर येत असताना त्याचा दम तुटला आणि तो पाण्यात बुडू लागला.
तेव्हा तेथील मत्स्य प्रकल्पावर उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत शुभम घोडके हा पाण्यात बुडून गेला. परिसरातील काही तरुणांनी त्याला ताबडतोब पाण्याच्या बाहेर आणले. भागवत वराळे यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून शुभम घोडके याला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी त्याला तपासुन उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
मयत शुभम लक्ष्मण घोडके हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


