फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; संशयित आरोपी फरहान शेखविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: मोबाईलमधील फोटो आई-वडिलांना पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका १८ वर्षीय तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फरहान सादीक शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित आरोपी फरहान सादीक शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याने पीडित तरुणीला अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण परिसरात नेले. तेथे तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून, ते फोटो कुटुंबाला पाठवण्याची व इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली.
या भीतीपोटी तरुणीने शांत राहणे पसंत केले, मात्र आरोपीने या धमकीचा गैरफायदा घेत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. अखेर या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत.


