सहा लाखांच्या एमडी ड्रग्जसह निंबळक बायपास परिसरात तरुणाला अटक ; दोघे कारसह पसार

सहा लाखांच्या एमडी ड्रग्जसह राजस्थानच्या तरुणाला अटक
निंबळक बायपास परिसरात एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दोघे कारसह पसार

अहिल्यानगर,-एमआयडीसी पोलिसांनी निंबळक बायपास परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे 5 लाख 83 हजार 200 रुपये किमतीचे 29.16 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थासह राजस्थानमधील एका तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत दोन संशयित मात्र कारसह पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मांडे, पोलीस अंमलदार उमेश शेरकर, सचिन हरदास, सूरज देशमुख, अक्षय रोहोकले यांच्या पथकाने शुक्रवार दि. 24 जुलै रोजी सकाळी हद्दित गस्त घालत असताना ही कारवाई केली.

निंबळक बायपास रोडवरील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ दोन विनानंबर चारचाकी वाहने संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी जवळ जाताच त्यातील दोघे एका कारमधून पळून गेले. मात्र उभ्या असलेल्या दुसऱ्या विनानंबर स्विफ्ट कारजवळील तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपले नाव रविप्रकाश भैराम बिश्नोई (वय 29, रा. जालोर, राजस्थान; सध्या रा. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्याकडील माहिती संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष तपासणी करण्यात आली.

स्विफ्ट कारच्या मागील सीटवरील प्लास्टिकच्या पिशवीत 25.89 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) तसेच 1.26 ग्रॅम व 1.99 ग्रॅम वजनाचे तीन पुडे आढळून आले. संशयिताने हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या एमडीचे एकूण वजन 29.16 ग्रॅम आहे.

या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोनसह, स्विफ्ट कार, मोबाईल असा एकूण 11 लाख 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारवाईदरम्यान दुसऱ्या कारमधून पळून गेलेल्या दोन संशयितांपैकी एकाचे नाव ‘तांबे’ असल्याचे समजले असून दुसरा संशयित अज्ञात आहे. दोघांचा शोध सुरू आहे.

चौकशीत संशयित रविप्रकाश बिश्नोईने हे ड्रग्ज राजस्थानमधून अहिल्यानगरात विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. तो मूळचा राजस्थानचा असून सध्या सोलापूर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. सोलापूरमधून तो अहिल्यानगर शहर व परिसरात एमडी ड्रग्जचा पुरवठा आणि विक्री करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून ड्रग्ज पुरवठा साखळीतील इतर साथीदारांची माहितीही मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या रविवारी तोफखाना पोलिसांनी सवेडीत कारवाई करून सुमारे 155 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. त्यामुळे अहिल्यानगर शहर व परिसरात एमडीची विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles