अहिल्यानगर : नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावरील वांबोरी फाटा येथे झालेल्या अपघातात सागर साहेबराव रंधवे (रा.अगस्थान, ता. पाथर्डी,) या 29 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी, सागर रणदिवे हा वरवंडी येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान सागर हा पुन्हा नगरच्या दिशेने दुचाकीवरून घरी जात असताना असताना त्याच्या दुचाकीला मालवाहतूक ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात वाहनाचे चाक थेट सागरच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून, घटनास्थळाचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.गेल्या 10 दिवसांत नगर-मनमाड महामार्गावर हा चौथा बळी गेल्याने हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. आंदोलन संपल्यानंतर काही तासांतच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.


