अहिल्यानगर : रात्री हॉटेल बंद करून मित्राची कार देण्यासाठी चाललेल्या हॉटेल चालकाला महामार्गावर अडवून त्यास कोयत्याने मारहाण करत कारच्या काचा फोडून नुकसान केल्याची तसेच कार मधील १५ हजार रुपये बळजबरीने घेवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर – कल्याण महामार्गावर नेप्ती शिवारात असलेल्या छत्रपती अभियांत्रिकी कॉलेजच्या गेट समोर ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली.
सचिन बाळासाहेब जपकर (वय ३२, रा. रानमळा, नेप्ती, ता.नगर) असे जखमी हॉटेल चालकाचे नाव असून त्यांच्या फिर्यादी वरून राहुल ठाणगे (रा.हिवरे बाजार, ता.नगर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जपकर हे नगर कल्याण रोडवर असलेले त्यांचे साई हॉटेल बंद करून त्यांचा मित्र बापू मच्छिंद्र पुंड (रा. निमगाव फाटा, ता.नगर) यांच्या कडे त्यांची हुंदाई कंपनीची कार (क्र.एम एच १७ बी वाय ५६५९) ही देण्यासाठी चालले होते. छत्रपती अभियांत्रिकी कॉलेजच्या गेट समोर आरोपी राहुल ठाणगे याने दारूच्या नशेत त्याची मारुती स्विफ्ट कार त्यांच्या कार समोर आडवी लावली.
कार मधून कोयता काढत तू लय माजला का ? कॉलेजला असताना लय दादागिरी करत होता. असे म्हणून शिवीगाळ करत फिर्यादीच्या हातावर कोयत्याने वार केला. तसेच फिर्यादीकडे असलेल्या कारच्या काचा फोडत नुकसान केले व कार मधील १५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी राहुल ठाणगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो.हे.कॉ. सोमनाथ जायभाय हे करत आहेत.


