संगमनेरच्या रेल्वेसाठी आंदोलन नव्हे, जिद्दीने पाठपुरावा करू, डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेरच्या रेल्वेसाठी आंदोलन नव्हे, जिद्दीने पाठपुरावा करू,रेल्वेसाठीही सर्वात पुढे उभा राहीन : डॉ. सुजय विखे पाटील

रहिमपूरमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात; सुजय विखे, अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर : आदिवासी समाजाने विखे पाटील परिवारावर गेल्या ४० वर्षांपासून दाखवलेले प्रेम आणि विश्वास ही आमच्यासाठी केवळ राजकीय ताकद नसून मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून तो मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करत राहू, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

रहिमपूर ता संगमनेर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम शिंदे होते. व्यासपीठावर गणपतराव शिंदे, मारुतीराव मेंगाळ, संविधाताई शिंदे, रामभाऊ राहाणे, आशिष शेळके, प्रभाकर गुळवे, राहुल दिघे, अरुणराव शिंदे, एस.पी. आहेर, गोरख वाळुंज, किशोर वाघमारे, रोहित चौधरी, भैया मोरे, पप्पू गाढे, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाजबांधवांचे डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले.

मागील वर्षी आदिवासी समाज बांधवांना दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, १८ वर्षांखालील मुलांसाठी आधारकार्ड शिबिर घेऊन आधारकार्ड उपलब्ध करून देण्यात आले. पावसाळ्यात काही कुटुंबांच्या घरात पाणी शिरत असताना ते स्वतः घटनास्थळी जाऊन मदत केली. यंदा त्या घरांमध्ये पाणी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली नाही. आता याच व्यासपीठावरून पुन्हा एक शब्द देतो की, पुढील वर्षी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी वेडू आई सभामंडपाचे काम पूर्ण झालेले असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे म्हणाले पद, मंत्रीपद किंवा राजकीय जबाबदाऱ्या येतात-जातात, मात्र केलेले काम अनेक वर्षे लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे काम हीच आमची ओळख आहे, असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा आणि पुण्याईचा उल्लेख केला. सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळे विखे पाटील परिवाराला समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली असून ती संधी जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरणे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाचा केवळ मतदानापुरता विचार न करता समाजात जाऊन त्यांचे छोटे-मोठे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. समाजातील मुलांनी शिक्षण घेतले तर त्यांच्या परिवाराला आधार मिळेल आणि समाजाचे भविष्य घडेल. पुढील पाच-दहा वर्षांत आदिवासी समाजातील एखादी मुलगी किंवा मुलगा जिल्ह्याच्या प्रशासनातील सर्वोच्च पदावर पोहोचावा, यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे, असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

संगमनेरच्या रेल्वेच्या प्रश्नावरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. संगमनेरच्या विकासासाठी रेल्वेची आवश्यकता आहे आणि संगमनेरमार्गे रेल्वे नेण्याची होण्यासाठी तर आपण सर्वात पुढे उभे राहून त्या मागणीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच रेल्वेसाठी केवळ आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत,त्यासाठी सातत्य, जिद्द आणि शासनाच्या पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्यक असतात. शिर्डीला रेल्वे आणण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच जिद्दीने संगमनेरलाही रेल्वे स्थानक आणि रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिला.

संगमनेरचा विकास झाला पाहिजे ही भूमिका स्पष्ट करताना महायुती सरकार संगमनेर तालुक्याच्या प्रश्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

एखादा प्रश्न नियमात बसत नाही म्हणून तो नाकारण्याची भूमिका घेता कामा नये. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने मार्ग काढणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. गरीबांच्या डोळ्यातील पाणी पुसता आले, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता आले आणि त्यांच्या कुटुंबाला चांगले जीवन देता आले, तर त्याच कामाला खऱ्या अर्थाने लोकसेवा म्हणता येईल, अशी भूमिका डॉ. विखे पाटील यांनी मांडली.

आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पुढील अधिवेशनात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. आदिवासी समाजातील नागरिकांच्या जमिनी बळकावण्याच्या तक्रारींबाबत प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून, संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक वनहक्कांशी संबंधित जमिनींच्या नोंदी, स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना यांसारख्या प्रश्नांवर शासनाने घेतलेल्या निर्णयांचा लाभ समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांना होत असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले.

शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आश्रमशाळा, वसतिगृहे आणि इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत युवकांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. आदिवासी समाजाच्या आरोग्य, जमीन, शिक्षण आणि इतर मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन देताना आमदार खताळ म्हणाले की, डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

संगमनेर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना आगामी अधिवेशनात सभागृहात मांडून सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles