अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम पारनेर मतदारसंघ वगळता जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात मोहिमेपूर्वी असलेल्या 38 लाख मतदारांपैकी तब्बल 4 लाख 26 हजार मतदार असंकलित (मयत, दुबार नोंदणी आणि कायम स्वरूपी स्थलांतरित) आढळले आहेत. या सर्व मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार गेल्या सव्वा महिन्यांपासून 12 विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिम राबण्यात आली. या मोहिमेत एकूण 38 लाख मतदारांपैकी सुमारे 4.26 लक्ष मतदार हे असंकलीत (मयत, दुबार कायम स्वरुपी स्थलांतरित मतदार) असल्याचे आढळून आले असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय याच्या याद्या तयार करण्यात आल्या असून या याद्या स्थानिक मतदारसंघनिहाय मतदान केंद्र सहाय्यक अर्थात बीएलओ यांच्याकडे देण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर याद्या मतदारांनी तपासून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. असंकलीत मतदार यांची यादी स्थानिक पातळीवर सार्वजनिक कार्यालयात प्रसिद्ध करण्यासोबतच जिल्हास्तरीय वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिली आहे. जिल्ह्याच्या वेबसाईटवर ही यादी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
असंकलीत यादीतील मतदार यांना त्यांच्या मतदारसंघातील नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क करता येईल. याशिवाय स्थानिक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क करता येईल. याशिवाय जिल्हास्तरावर 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मतदारांची ग्रामीण व शहरी भागातील घर क्रमांकाची माहिती मागविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. तसेच ज्याज्या ठिकाणी शाळेत मतदान केंद्र आहे, त्या सर्व ठिकाणी युडीआयएस कोड देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र सुसूत्रीकरण अंतर्गत नवीन मतदान केंद्र तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास सादर केला असल्याचीही माहिती उपजिल्हाधिकारी गाढे यांनी दिली आहे.


