अहिल्यानगर: महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा तापला असून विविध समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्यासाठीही हैदराबाद गॅझेटियर ग्राह्य धरले जावे, अशी मागणी बंजारा आणि वंजारी समाजाकडून केली जात आहे. या मागणीसाठी या समाजातील नेत्यांकडून रस्त्यावर उतरून निदर्शनेही केली जात आहे. अशातच शेवगाव तालुक्यातील कोणोशी गावात धक्कादायक घटना घडली आहे. अमोल दौंड या 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. शेवगाव तालुक्यातील कोणोशी गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. अमोलने टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून या चिठ्ठीतून त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा उलगडा झाला आहे.
अमोल दौंड हा वंजारी समाजातील तरुण होता आणि त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते की, “आपल्या जातीचं काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे,” असा उल्लेख अमोलने सदर चिठ्ठीत केला आहे. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच अमोलने नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


