भोंदू अशोक खरातचे काळे साम्राज्य उभारण्यात अनेक उद्योजक, राजकीय नेत्यांचेही आर्थिक बळ मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे. शिर्डीत चार एकर जमीन व्यवहारापूर्वी खरातच्या नाशिकमधील दोन बँक खात्यात नगर, नाशिकच्या सहा जणांनी सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक रक्कम आरटीजीएसने टाकल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यात नगर जिल्ह्यातील शेवगावच्या चौघांचा समावेश आहे. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांना पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी पाचारण केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भोंदू खरात, त्याची पत्नी कल्पनाची नाशिक आणि सिन्नर येथील बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक या दोन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती आहेत. त्यात मागील दोन वर्षांत 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांच्या चार एकर जमिनीची पाच कोटींना खरेदी करण्यात आली होती. अशोक खरातने गोंदकर यांना ही रक्कम वेगवेगळ्या तारखांना वर्ग केली होती.
मात्र, रावसाहेब गोंदकर याने फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, यासह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्याविरोधात सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, अशोक खरात याच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असताना समता पतसंस्थेतील 100 बनावट खात्यांवरील 60 कोटींचा गैरव्यवहार शिर्डी पोलिसांच्या तपासात पुढे आला. याशिवाय, शिर्डीतील जमीन खरेदी करण्यापूर्वी काही दिवस अगोदर अशोक खरात याच्या नाशिक आणि सिन्नर येथील दोन बँकांमध्ये तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती, हेही तपासात निदर्शनास आले.
अहिल्यानगरचे एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अशोक खरातच्या बँक खात्यात पैसे कोणी पाठविले, याची माहिती संकलित केली गेली. ट्रान्झॅक्शन आयडीवरून ‘त्या’ लोकांना डिटेक्ट करण्यात आले. यामध्ये नाशिक येथील एका दाम्पत्यासह नगर जिल्ह्यातील शेवगावच्या चौघांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याचे समजते. शिर्डी पोलिसांनी संबंधित सहा जणांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. आज-बुधवारी हे सहा जण हजर होणार असून, त्यांनी कोणत्या कारणासाठी खरातच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले, याचे रहस्य उलगडणार आहे.


