राहुरी -दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणार्या मुळा धरणातून काल बुधवार दि. 9 जुलै रोजी सावधानतेचा इशारा म्हणून तीन वेळा सायरन वाजवून कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते धरणाच्या अकरा वक्राकार दरवाजांची कळ दाबून नदीपात्रात 3 हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.दरम्यान, काल सकाळी मुळाधरणात 17 हजार 844 दलघफू इतका पाणीसाठा होता. तर आवक 2 हजार 247 क्युसेसने सुरू होती. मात्र दुपार नंतर धरणात पाण्याची आवक वाढून सायंकाळी ती 5 हजार 327 झाली व पाणीसाठा 18 हजार 161 झाला. जलाशय परिचालन सुची नुसार 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान 69.85 टक्के पाणीसाठा ठेवणे बंधनकारक असल्याने व धरणात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता नदीपात्रात 3 हजार क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला.
या वर्षी कोतुळकडून मुळा धरणाते 9 हजार 256 दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे.
तसेच कोतुळ येथे 261 मिलिमिटर व मुळानगर 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळा धरणातून पाणी सोडले हे पाणी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर धरणावर गर्दी करत असतात. त्यामुळे सुरक्षिततेसाठी 4 पोलिस तैनात करण्यात आले आहे. याप्रसंगी अभियंता विलास पाटील, धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे, स्थापत्य सलीम शेख, सागर अवगुणे आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
सध्या धरणात कोतूळकडून 5 हजार 327 क्यूसेसने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या अकरा वक्राकार दरवाजाद्वारे 3 हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीकाठेवरील लोकांनी सावध रहावे. 15 जुलै पर्यंत धरणात 18 हजार 155 ठेवायचा आहे. त्यानंतर धरणात 89 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर पुन्हा पाणी सोडण्यात येईल.
– सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे


