स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 52 लाखांची लूट; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून 5 जणांना अटक

अहिल्यानगर,: स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखवून मारहाण करून 52 लाख 80 हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. 5 आरोपींकडून 26 लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याची हकीगत
फिर्यादी अविनाश अनिल नलावडे (रा. सणसवाडी, ता. मानगाव, जि. रायगड) यांना आरोपी राजू मोहिते व अक्षय मोहिते (दोघे रा. नांदेड) यांनी कामावर ठेवून विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वस्तात सोने देतो असे आमिष दाखवून 4 जून रोजी सायंकाळी बुरुंगाव शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ बोलावले. तेथे फिर्यादी व साक्षीदार यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 52 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नांदेडमध्ये छापा टाकून अटक
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने तपास सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत आरोपी झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ छापा टाकून 1) शिवाजी उर्फ शिवा विठ्ठल मोहिते (वय 52), 2) राजू उर्फ चंदु रामदास मोहिते (वय 36), 3) अक्षय उर्फ आकाश रामदास मोहिते (वय 27), 4) छगन दशरथ मोहिते (वय 36) व 5) दिनेश सुदाम जाधव (वय 24) या पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

26 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून 16 लाख 50 हजार रुपये रोख, 1 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 8 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, बनावट सोन्याची नाणी व कोयता असा एकूण 26 लाख 52 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू
आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिष भोये, पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, सुनिल पवार, फुरकान शेख, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles