राहुरी, पाथर्डी, नगर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवणुकीसाठी आज गुरूवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी 1 लाख 87 हजार 463 (56.20 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच दिव्यांग व वयोवृध्द मतदारांनीही आपला मतदानाचा घरी बसल्या हक्क बजावला असून 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत या पोटनिवडणुकीत जवळपास 18 टक्के मतदान कमी झाल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. दरम्यान, मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
आज गुरूवारी सकाळी 7 वाजता राहुरी विधानसभा मतदार संघातील राहुरी शहर, तालुका तसेच पाथर्डी, नगर तालुक्यातील गावांमध्ये मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदान धिम्या गतीने सुरू होते. सकाळी 9 वाजेपर्यंत मतदार संघात अवघे 6.42 टक्के मतदान झाले. त्यानंतर 9 वाजेनतंर मतदानाची गती कासवगतीने वाढू लागली. सकाळी 11 वाजेपर्यंत 60 हजार 784 (18.22 टक्के) मतदान झाले. दुपारी 1 वाजे पर्यंत 98 हजार 740 (29.60 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदानाची गती पुन्हा मंदावली. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 1 लाख 32 हजार 255 (39.65 टक्के) मतदारांनी मतदान केले. तसेच सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लाख 69 हजार 244 (50.74 टक्के) मतदारांनी मतदान केले. सायंकाळी मतदान संपेपर्यंत 1 लाख 87 हजार 463 (56.20 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सर्वच मतदान केंद्रावर कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदारांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तसेच मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच 374 मतदान केंद्रावर वेबकास्टींगद्वारे प्रशासन लक्ष ठेऊन होते. तसेच 36 पोलीस अधिकारी, 708 पोलीस कर्मचारी आणि 391 होमगार्ड तैनात करण्यात येऊन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यातील बुर्हाणनगर येथे मतदान केले. माजी प्राजक्त तनपुरे, माजी खा. प्रसादराव तनपुरे, अरूण तनपुरे, हर्ष तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शहरातील प्रगती विद्यालयात तर नगराध्यक्ष भाऊसाहेब मारे यांनी भागिरथीबाई तनपुरे विद्यालयातील मतदान केंद्रात रांगेत उभा राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच अपक्ष उमेद्वार रावसाहेब सदाराम खेवरे यांनी देसवंडी येथे तर अथर्व साहेबराव म्हसे यांनी कोंढवड येथे मतदान केले.
गेल्या पंधरा दिवसांपासून कडक उन्हात मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. मतदार संघातील गावागावात व वाड्यावस्त्यांवर जाऊन उमेदवारांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेट घेऊन मतदानासाठी आवाहन केले. या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून काल त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दि. 4 मे रोजी राहुरी येथील लोकनेते धुमाळ महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी याबाबत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मतदान पेट्या हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.


