Saturday, February 21, 2026

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाल्याच्या कुटुंबाचा कर माफ; ग्रामपंचायतीने घेतला अनोखा निर्णय

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत यासाठी पूर्णा तालुक्यातील देऊळगाव (दुधाटे) ग्रामपंचायतीने अनोखा निर्णय घेतला आहे. गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीकडून पूर्ण कर माफ करण्यात येणार आहे.

देऊळगाव दुधाटे येथील जिल्हा परिषद शाळेची स्थापना शंभर वर्षांपूर्वी झालेली आहे. या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी लोक सहभागातून शाळेचा विकास साधला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने शिक्षणासाठी असलेल्या निधीचा योग्यप्रकारे वापर करून शाळेत पायभूत सुविधा व शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली आहेत. तज्ज्ञ शिक्षकवृंद आणि गावकऱ्यांची जागरूकता यामुळे शाळेची गुणवत्ता वाढली आहे. परिणामी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेत यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश वाढावेत यासाठी ग्रामपंचायतीने नवा निर्णय घेतला आहे. जि. प. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे. यामुळे शाळेत प्रवेश वाढवण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे कर माफीचा निर्णय घेणाऱ्या देऊळगाव दुधाटे ग्रामपंचायतीच्या सरपंच ललीताबाई उत्तमराव कांबळे, उपसरपंच दिगंबर दुधाटे, ग्रामविकास अधिकारी विशाल अंभोरे व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव ही जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतसाठी उत्पन्नाचे अन्य मार्ग आहेत. आठवडी बाजार भरतो, शिवाय इतरही व्यापारी संकुलांकडून कर वसूल करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे. शासनाचा वित्त आयोगाचा निधी, इतर योजनांचा निधी व इतर नागरिकांकडून होणारे कर संकलन यातून ग्रामपंचायत विकासकामांसाठी खर्च करणार आहे. जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांचा संपूर्ण कर माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला, अशी प्रतिक्रिया सरपंच ललिताबाई उत्तमराव कांबळे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles