रील बनविण्याच्या नादात बसली फाशी
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने सोशल मीडियावर “फाशीचा रील” टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला व नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला व गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धात त्यास फाशी बसली पण याच सुमारास व्हिडीओ करणा-या नातेवाईकांनी त्वरीत फेट्याची गाठण दगडाने तोडली व त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. सध्या तो उपचारास प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका हॉटेलमध्ये वेटर काम करणारा प्रकाश भीम बुडा (वय १७, रा. नेपाळ) हा नातेवाईक असलेला मामा मिलन बुडा (रा. नेपाळ) हे दोघे फाशी घेतानाच रिल काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जामखेड करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या झाडीत गेले तेथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा याने फेटा बांधला व गळफास तयार केला व नातेवाईक मामा यास व्हिडीओ काढायला लावला या दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रिलला साजेसी भाषा तयार बोलला व गळफास गळ्यात घातला. क्षणार्धात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले. व्हिडीओ काढणा-या मामाने प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडाने तोडली तोपर्यंत प्रकाश बुडा हा बेशुद्ध पडला होता.
नातेवाईक मामा याने हॉटेल मालकास फोनवर घडलेली घटना सांगितली. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अम्ब्युलन्स घेऊन बोलवले व उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी उपचार चालू केले आहे. गळफास बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचे सांगितले.
फाशीचा दिखावा – फार्स नव्हे, जीवघेणी चूक आहे : रमेश गुगळे
आजकाल सोशल मिडियासाठी वेगवेगळे मन वेधून घेण्यासाठी ‘रिल’ बनवायची एक मनोविकृत पध्दत आलेली दिसते. काही लोक नदीच्या पुराचे, समुद्रातील लाटांचे, डोंगरकड्यावरील धोकादायक जागेवरचे तसेच फाशी घेतल्यासारखे धोकादायक सीन करतात..आणि जीवाला मुकतांना दिसतात.. खास करुन तरुण – तरुणी यामध्ये अग्रेसर दिसतात… यात त्यांच्याआई-बापाला , पालकांना काय यातना भोगाव्या लागतात.. याचा साधा विचारही येत नाही का मनात यांच्या…
अलीकडेच अशाच एका घटनेत एक युवक फाशीचा अभिनय करताना खरंच श्वास घेऊ शकला नाही आणि तो बेशुद्ध झाला. हा केवळ फार्स नाही, केवळ विनोद नाही तर प्राणघातक आहे.
तरुण पिढीनं खूप विचार करायलाच हवा.
🛑 कृपया अशा प्रकारचे प्रयोग टाळाच!
🛑 जीवनाचं मोल लक्षात घ्या – काही सेकंदांचं मनोरंजन, आयुष्यभराचं नुकसान ठरू शकतं!
🛑 पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी संवाद साधावा आणि त्यांना अशा गोष्टींचे गांभीर्य पटवून द्यावे.
🛑 सोशल मीडियावर ‘लाईक्स’साठी जीवाशी खेळू नका!
आपली कृती दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरते – ती जबाबदारीने घ्या असं मत सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उदयोजक रमेश गुगळे यांनी व्यक्त केली .


