उपअधीक्षक संदीप मिटके गोळीबार करणार्‍या गुन्ह्यातील आरोपीचे जिल्हा रूग्णालयातून पलायन

राहुरी तालुक्यातील अत्याचार्‍याच्या घटनेतील पीडित महिला व तिच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा व श्रीरामपूर उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणार्‍या गुन्ह्यातील आरोपी व पुणे पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लक्ष्मण लोखंडे (वय 52 रा. वानवडी, पुणे) याने मंगळवारी (10 जून) सकाळी येथील जिल्हा रूग्णालयातून पलायन केले आहे. यामुळे रूग्णालय प्रशासन व पोलीस दलात खळबळ उडाली असून त्याचा शोध घेतला जात आहे.

लोखंडे याच्याविरूध्द एका महिलेने अत्याचाराचा आरोप करत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेने जबाब देण्यापूर्वीच तिला आणि तिच्या दोन मुलींना धमकवण्यासाठी लोखंडे 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी तिच्या घरी पोहोचला. त्याने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तत्कालीन उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा लोखंडेने हवेत गोळी झाडून दहशत निर्माण केली. पोलीस पथक पीडितेच्या मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढत असताना उपअधीक्षक मिटके व लोखंडे यांच्यात झटापट झाली व लोखंडेने गोळी झाडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेत असलेला व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या लोखंडे याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या बंदोबस्तासाठी येथील पोलीस मुख्यालयातील दोन अंमलदारांची नियुक्त करण्यात आलेली होती. त्या पोलीस अंमलदारांना गुंगारा देऊन त्याने पळ काढला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून, त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, यासंदर्भात लोखंडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संजु वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 262 प्रमाणे (एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अटकाव करणे) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles