राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलीस सोनम रघुवंशीला घेऊन शिलाँगला रवाना झाले आहेत. पोलीस आज रात्री उशिरा सोनमला घेऊन शिलाँगला पोहचतील. त्यानंतर सोनम आणि इतर आरोपींसह गुन्हा कसा केला ते त्यांना त्या ठिकाणी नेऊन रिक्रिएट केलं जाणार आहे. आरोपींपैकी विशाल चौहानच्या घरी पोलीस पोहचले तेव्हा त्यांना गुन्हा करताना म्हणजेच राजाची हत्या करताना विशालने जे कपडे परिधान केले होते ते मिळाले.सोनम माझ्या मुलाची हत्या म्हणजेच राजाची हत्या करेल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरुन असंच वाटतं आहे तीच या सगळ्यात सामील आहे. राजाच्या फोटोला हार घालण्यात आला आहे. हा फोटो जवळ घेऊन त्याची आई म्हणाली, सोनमला दुसरा मुलगा आवडत होता तर मग तिने राजाशी लग्न करण्यास नकार का दिला नाही? तिने माझ्या मुलाची हत्या का केली? तर राजाच्या वडिलांनी म्हटलं आहे की ज्यांनी माझ्या मुलाला ठार केलं त्यांना फाशी द्या. माझ्या मुलाला तडफडत ठेवलं आणि मारण्यात आलं आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून सगळ्या आरोपींना फाशी द्या. अशी मागणी राजाच्या वडिलांनी केली आहे.
सोनमच्या आईने सोनमवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत असा दावा केला आहे. माझ्या मुलीला खोट्या आरोपांमध्ये अडकवलं जातं आहे. राजा रघुवंशी बरोबर मेघालयात काय झालं ते मला अद्याप सांगता येणार नाही.
इंदूर येथील राजा रघुवंशी याच्या हत्येतील चार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे इंदूर गुन्हे शाखेने मंगळवारी सांगितले. पोलीस अधीक्षक पूनम चंद यादव यांच्या मते, आरोपींनी केवळ हत्या केल्याची कबुली दिली नाही, तर यावेळी राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी घटनास्थळी उपस्थित होती आणि “सोनम पतीची हत्या होताना ते सर्व पाहत होती”, असेही सांगितले आहे.
“चारही आरोपींनी राजा रघुवंशी याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. राजा रघुवंशींवर पहिला वार विशाल उर्फ विकी ठाकूरने केला. चौकशीदरम्यान आरोपींनी राजा रघुवंशींवर कसा हल्ला केला आणि नंतर त्यांचा मृतदेह खोल दरीत कसा फेकला, याचीही माहिती दिली आहे,” असे पोलीस अधीक्षक पूनम चंद यादव यांनी इंडिया टुडे टीव्हीशी विशेष संवाद साधताना सांगितले.
इंदूर गुन्हे शाखेच्या तपासानुसार, विशाल, आकाश आणि आनंद हे तिघे आरोपी इंदूरहून ट्रेनने निघाले. त्यांनी मेघालयात पोहोचण्यासाठी अनेक गाड्या बदलल्या, ते प्रथम गुवाहाटी आणि नंतर शिलाँगला गेले, असे पोलीस अधिक्षक पूनम चंद यादव यांनी स्पष्ट केले.
हत्येचा कट रचणारा सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहा हत्येवेळी इंदूरमध्येच थांबला होता, परंतु त्याच्यावर आरोप आहे की त्याने तिघांनाही त्यांच्या प्रवास खर्चासाठी प्रत्येकी ४०,०००-५०,००० रुपये देऊन आर्थिक मदत केली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, ते राजाला मारत होते तेव्हा सोनम रघुवंशी घटनास्थळी उपस्थित होती आणि सर्व पाहत होती.


