नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून सदर चोरट्याचा मृतदेह प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा व तेथून सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर व त्यानंतर ससून रुग्णालय,पुणे येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली.
याबाबत पोकॉ वासुदेव ठकाजी डमाळे (वय 37), यांनी पोलीस ठाण्यात लेखी खबर दिली की, 18 एप्रिल रोजीचे पहाटे शरद वाघ यांनी कॉल करुन सांगितले की रांजणगावदेवी येथील वाकचौरे वस्तीवर चोर आले असून त्यातील एक चोराला चोरी करताना पकडले आहे. असा कॉल पडल्याने मी व सोबत चालक पोकॉ संतोष खंडागळे असे आम्ही वाकचौरे वस्तीवरील पाण्याचे टाकीजवळ, रांजणगाव ता. नेवासा येथे कॉलरचे सांगणे प्रमाणे गेलो. त्या ठिकाणी विष्णु अशोक चौधरी यांनी सांगितले की, माझे घराचे बाहेर माझी पत्नी झोपलेली असताना तिचे गळ्यातील सोन्याचे दागीने चोरट्याने जोरात ओढल्याने तिस जाग आली, ती मोठ्याने ओरडल्याने मला जाग आल्याने मी व माझा भाऊ महेश अशोक चौधरी असे आम्ही उठलो. त्यावेळी दोन चोरटे दोन दिशेला पळाले, त्यातील एका चोरट्यांचे पाठीमागे आम्ही दोघे पळालो.
आम्ही पाठलाग करत असलेला चोरटा हा आम्हाला मिळुन आल्याने आम्ही त्यास ताब्यात घेतले. तो पळून पळुन दमला असल्याने आम्ही त्याला पाणी पिण्यास दिले त्यावर त्यास उलटी झाली व तो चक्कर येवून खाली पडलेला आहे असे सांगितल्याने त्या चोरट्याकडे पाहीले असता तो चोरटा निपचित व बेशुध्द अवस्थेत पडलेला दिसून आला. तो हालचाल करत नसल्याने मी लागलीच डायल 108 अम्बुलन्सला फोन करुन उपचाराकरीता बोलावुन घेतले. तिथे अॅम्बुलन्स आली असता त्यामधील डॉक्टर श्रीमती बनकर यांनी त्या अनोळखी चोरट्याला तपासून मयत घोषीत केले.
अनोळखी चोरट्याची ओळख पटविण्याकरीता त्याची झडती घेतली असता त्याचे खिशात औषध उपचाराची चिठ्ठी मिळुन आली. त्यावरुन त्या अनोळखी चोरट्याची ओळख पटली असून त्याचे नाव रामदास काळे रा. अरणगाव ता. जामखेड, जि.अहिल्यानगर असे असल्याचे समजले आहे. मयताचे नातेवाईकांना फोन करून घटनेबाबत माहीती दिली आहे. मयत इसमाचा मृत्यू निश्चीत कोणत्या कारणामुळे झाला आहे हे सजण्यासाठी इन्कवेस्ट पंचनामा करुन शवविच्छेदन होणेस विंनती आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सपोनि अमोल पवार हे पुढील तपास करित आहेत.


