पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करा
अहिल्यानगर, — एकात्मिक आदिवासी प्रकल्प, राजूर यांच्या मार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी चार महिन्यांच्या कालावधीचे पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी २५ जुलै २०२५ पर्यंत अर्ज पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी ता. अकोले येथे सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.
१ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्जासोबत १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवासी दाखला किंवा रेशनकार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र, चार पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह अर्ज सादर करावा. उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. वजन किमान ४५ किलोग्रॅम व उंची किमान १५५ से.मी. असावी.
प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रियेत शारीरिक क्षमता चाचणी (८०० मीटर धावणे) व लेखी परीक्षा प्रत्येकी ५० गुणांची, अशा एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मेरिटनुसार करण्यात येईल. उमेदवारांचे ऑफलाइन अर्ज केवळ २५ जुलैपर्यंतच स्वीकारले जातील. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी परीक्षेसाठी दि. २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी ता. अकोले येथे मूळ व छायांकित कागदपत्रांसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ अथवा ८८०५६९८९४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


