नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूरच अडकले साडेसतीच्या फेऱ्यात?

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर देवस्थानाबद्दल वेगवेगळ्या अख्यायिका आहेत. या गावात चोरी होत नाही, कारण चोरी करणाऱ्याला शनी देव सोडत नाहीत, असे सांगतात. तर दुसरीकडे कोणी अडचणीत सापडला, साडेसती मागे लागली तर शनिदेवाच्या दर्शनाला जातात. अशी या शनी देवाची महती. अलीकडे मात्र या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाला आणि प्रशासन तसेच पाठिराख्यांच्या मागेच साडेसती लागली की काय? अशी शंका येते.
गेल्या काही दिवसांपासून या देवस्थानशी संबंधी विविध वाद समोर आले. गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विधानसभेत प्रश्न आला, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. पुढे धर्मादाय आयुक्तांकडून चौकशीही सुरू झाली. अशात आता शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन सूर्यभान शेटे (वय ४३, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यांच्या घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. शेटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. ते माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. घरात कोणी नसताना त्यांनी गळफास लावून घेतला. ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. आधी आरोप, मग मोर्चा, देवस्थावर कारवाईची नामुष्की, विधासभेत चौकशीची घोषणा, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी सुरू आणि आता ही आत्महत्या अशी शुक्लकाष्टची मालिकाच सुरू झाली आहे.

शनिशिंगणापूरमधील वाद सर्वप्रथम समोर आले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यानंतरही सोशल मीडियातून यासंबंधी कुजबुज सुरूच आहे. मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे, अतिरिक्त आणि बोगस कर्मचारी भरती, बनावट मोबाईल अप्लिकेशनद्वारे भाविकांची फसवणूक यामुळे गेल्या काही काळापासून हे देवस्थान चर्चेत आहे. त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर आता पुढे काय होणार? कोण अडकणार? कोण सुटणार? अडकलेल्यांचे काय होणार? याचीही चर्चा, कुजबुज सुरूच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण थेट निवाडाही करू लागले आहेत. त्यामुळे यांच्याशी संबंधित व्यक्ती वेगळ्या दशहतीखाली, भीतीच्या सावटाखाली नसतील तरच नवल. अशा घटनांमध्ये मुख्य सूत्रधार, कर्तेकरविते बाजूला राहून इतरांचा बळी जातो, असाही अनुभव आहेच. त्यामुळे अस्वस्थता सहाजिक आहे.
आत्महत्या केलेले नितीन शेटे अभियंता होते. हुशार होते. गावात झालेल्या विविध विकास कामांच्या नियोजनात त्यांचा वाटा होता. अशा उमद्या अधिकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्ती होणारच, संतापही व्यक्ती केला जाणारच.
याला जबाबदार कोण? याची चौकशी मात्र झाली पाहिजे. असे सांगतात की शेटे मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. हसून खेळून राहत. शनिवारी कामावरून घरी जाताना ते सहकाऱ्यांसोबत नेहमीच्या मोकळेपणाने वागत होते. आपल्या मनातील भीता अगर शंका, आत्महत्येचा विचार त्यांनी कोणालाही बोलून दाखविला नव्हता, असे त्यांचे सहकारी सांगतात. घरात कोणी नसताना त्यांनी आत्महत्या केली. त्याबद्दल काही लिहूनही ठेवले नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळाली नाहीत. पोलिसांना याचा सखोल तपास करावा लागणार आहे. तसा तो झाला पाहिजे. शेटे यांचा कोणाशी संपर्क झाला होता का? कोणी त्रास देत होते का? भीता घालत होते का? त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्यावर या गोष्टी पुढे येऊ शकतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles