राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ५,०१२ नव्या पदांसह १७२ शिल्लक अशी एकूण ५,१७४ प्राध्यापक पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. ही गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठी प्राध्यापक भरती असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. त्याचबरोबर महाविद्यालयांतील सुमारे २,९०० शिक्षकेतर पदांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांची भरतीही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राध्यापक भरतीबाबतचा प्रश्न विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी २,९७३ प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र कोविड-१९ महामारीमुळे ही प्रक्रिया थांबली होती. नवीन सरकारच्या कार्यकाळात ही भरती पूर्ण करण्यात आली असून त्यानंतर आता ५,०१२ नव्या पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर आवश्यक बदलांचा समावेश करून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी रिक्त प्राध्यापक पदे तातडीने भरण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री म्हणाले.महाविद्यालयातील विद्यार्थीसंख्या, विषयनिहाय गरज आणि शासनाच्या निकषांनुसार प्रत्येक महाविद्यालयाला पदांचे वाटप करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आली असून सर्व महाविद्यालयांना त्यांचे पदवाटप संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाविद्यालयांनी रोस्टर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एनओसी देण्यात कोणताही अडथळा येणार नाही. मागील भरतीवेळी काही महाविद्यालयांनी व्यवस्थापनाच्या कारणास्तव भरती न केल्यामुळे ५०० हून अधिक पदे रिक्त राहिली होती. यावेळी अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्यात आली आहे. महाविद्यालयांतील सुमारे २,९०० शिक्षकेतर पदांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अंतिम भरतीसाठी राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


