राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील निवडणुका पार पाडायच्या आहेत. त्यासाठी आयोगाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीची तयारी आयोगाकडून अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य तारखाही समोर आल्या आहेत. पण महायुतीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात निवडणुका कधी जाहीर होणार? याबाबतची माहिती दिली आहे. मंचर येथे युवक युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटील यांनी राज्यातील निवडणुकाच्या तारखा सांगितल्यात. ५ नोव्हेंबर रोजी राज्यात निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच, ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतील, त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.
आमच्याकडील माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी नगरपालिका,नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील. तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद,पंचायत समिती मतदान होईल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होतील. 15 जानेवारी मतदान होईल आणि 31 जानेवारी सर्व निवडणुका पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करत वळसे पाटसांनी निवडणूकांचे वेळापत्रकच जाहीर केले. पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील.’ मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, वळसे पाटलांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामळे आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.


