Saturday, February 21, 2026

नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला ….नगर महापालिका निवडणुक ; 17 प्रभागांत 171 उमेदवारीसाठी इच्छुक

शहरात शिवसेनेच्या मुलाखतींना इच्छुकांची गर्दी
17 प्रभागांत उमेदवारी चाचपणी; 171 इच्छुकांची मुलाखत संपन्न
योग्य जागा न मिळाल्यास ‘स्वबळाचा’ सूर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना शिवसेनेने उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सोमवारी (दि. 17 नोव्हेंबर) टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेतल्या. या मुलाखतींसाठी शहरातील विविध प्रभागांमधून आलेल्या इच्छुकांसह शेकडो कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. 17 प्रभागांसाठी तब्बल 171 इच्छुकांनी मुलाखती दिल्याने वातावरण निवडणूक उत्साहापूर्ण बनले होते.
मुलाखतींच्या प्रारंभी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, राज्य प्रवक्ते संजीव भोर, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
कार्यकर्त्यांच्या कामगिरी, प्रभागातील जनसंपर्क, स्थानिक प्रश्‍न, विकासाची दृष्टी, तसेच प्रभागातील त्यांच्या प्रभावाच्या आधारे चाचपणी करण्यात आली. शहरातील वाढती राजकीय चढाओढ लक्षात घेता, प्रत्येक प्रभागात योग्य, सक्षम आणि जनतेच्या मनातील उमेदवाराची निवड करणे हे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन अनेक नवीन चेहरेही शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास पुढे येत आहेत. वरिष्ठ पातळीवर नव्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा योग्य मेळ साधून उमेदवारी निश्‍चित केली जाणार आहे. सर्व अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्याची माहिती त्यांनी दिली.
शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, उमेदवार ठरवताना पक्षनिष्ठा, जनाधार, काम करण्याचा अनुभव आणि स्थानिक लोकप्रियता यांचा काटेकोर विचार केला जाईल. महायुतीबाबत निर्णय वरिष्ठ घेतील; पण शिवसेनेला योग्य जागा न मिळाल्यास पक्ष स्वबळाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले.
राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी सांगितले की, युतीबाबत चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे. युती न झाल्यास शिवसेना इतर पक्षांसोबत न जाता स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. यावेळी सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, श्‍याम नळकांडे, अर्जुन दातरंगे, सुनील लालबोरफ्लद्रे, सुरेश तिवारी, अफलकार सातपुते, शिवाजी कदम, संग्राम कोतकर, घनश्‍याम सानप, अशोक दहिफळे, अभिजीत अष्टेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles