राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. जुलै महिना सुरू झाला असला तरी राज्यातील अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात अद्याप जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध माध्यमांमध्ये समोर येत असलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र जून महिन्याचा हप्ता अनेकांच्या खात्यात न आल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. दरम्यान, प्रशासनाकडून रखडलेले हप्ते लवकरच वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे जून आणि जुलै महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये एकत्र खात्यात जमा होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी लाभार्थी महिलांचे लक्ष आता पुढील हप्त्याकडे लागले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही तांत्रिक आणि पात्रतेशी संबंधित अडचणीही समोर आल्या होत्या. ई-केवायसी पूर्ण न करणे, बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसणे, तसेच पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणे यांसारख्या कारणांमुळे राज्यातील लाखो महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला होता. अशा महिलांची संख्या सुमारे ८० लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे अनेक लाभार्थींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच ३००० रुपये एकत्र जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता जुलै महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याची रखडलेली रक्कम एकत्र मिळणार का, याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.


