अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर 9 हजार 607 हरकती

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर बुधवारी शेवटच्या दिवसाअखेर तब्बल 9 हजार 607 हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या प्रत्येक हरकतीची स्थळ पाहणी करून निपटारा करण्यात येणार असून, संबंधित कार्यवाही महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर 28 नोव्हेंबरपर्यंत हरकती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. यासाठी अर्जाचे अ व ब नमुने उपलब्ध करून देण्यात आले होते.

तसेच, एकत्रित हरकती न घेता स्वतंत्र अर्ज सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यावर काही हजार हरकती प्राप्त झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने हरकती स्वीकारण्याची मुदत वाढवली. त्यानुसार 3 डिसेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांमधून 3 डिसेंबरपर्यंत एकूण 9 हजार 607 हरकती प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, हरकतींची पडताळणी आणि स्थळ पाहणीची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेचे कर्मचारी व बीएलओ थेट मतदारांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत. पुढील नियोजनानुसार 15 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी, तर 22 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles