अहिल्यानगर: महापालिकेने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीमध्ये १० हजार ६८९ दुबार नावे आहेत. एकाच पत्त्यावर १०० ते १५० मतदार राहत आहेत. मतदार यादीतील बनवेगिरी हा एक प्रकारचा राजकीय कट असल्याचा असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारे आहे. त्यामुळे लोकशाहीच्या गळ्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीने मतदार यादीच्या माध्यमातून फास बसवला आहे. हा फास आम्ही कधीच बसू देणार नाही. मतदार यादीतील अनियमितेविरुद्ध आपण लढा देणार असल्याचे सांगताना अभिषेक कळमकर यांनी सत्ताधारी व निवडणूक प्रशासनाला लक्ष केले.
कळमकर म्हणाले, आयुक्तांवर दडपण टाकून सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचना स्वतःच्या मनाप्रमाणे बदलून घेतली आहे. त्यामुळे पुढे होऊ घातल्या ‘डीलिमिटेशन’ प्रक्रियेलाही हाच धोका निर्माण झाला आहे. ‘जेरी मॅंडरिंग’ ही अमेरिकन संकल्पना आहे. तेथे सत्ता टिकवण्यासाठी मतदारसंघाची कृत्रिम फेरीरचना केली जाते, तसाच प्रकार अहमदनगर शहरामध्ये झाला आहे. मतदारांच्या मताला किंमत आहे म्हणून योजना व सवलती मिळतात. परंतु मतांशिवाय जिंकू शकतो, याची खात्री सत्ताधाऱ्यांना झाली तर मतदाराच्या अधिकाराची किंमत शून्य होणार आहे. याविरुद्ध आपण लढा सुरू केला आहे.
स्थानिक प्रशासन जरी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसले असले तरी आम्ही त्यांच्या मानगुटीवर उभे राहून न्याय मागणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदार यादीमध्ये एकाच पत्त्यावर शंभर ते दीडशे मतदार आहेत. पुरुषांचे लिंग स्त्रीला व स्त्रीचे लिंग पुरुषाला असे बदल मतदार यादीत करण्यात आला आहे. नाव एकच असले तरी तेथे वेगवेगळी छायाचित्र आहेत. तीन महिलांना एकच पती दाखवला गेला आहे. पत्ता व वास्तव्याचा पुरावा नसलेले मतदार यादीमध्ये आहेत. हे चुकून होत नाही तर हा एक रचलेला राजकीय गट आहे असाही आरोप त्यांनी केला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण जिल्हा परिषद गटातील ४३७१ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे मतदार श्रीगोंद्यात मतदान करणार व अहिल्यानगर शहरातही महापालिकेसाठी मतदान करणार आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने व महापालिकेने कोणती उपाययोजना केली, हे तक्रार करूनही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, असेही अभिषेक कळमकर म्हणाले.


