जिल्हा नियोजनवरील संदेश कार्लेंच्या निवडीने तालुक्यात शिवसेनेला बळकटी
अहिल्यानगर –
अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांच्या नुकत्याच निवडी झाल्या आहेत. त्यात नगर तालुक्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगर तालुका पंचायत समिती माजी सभापती संदेश कार्ले यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संदेश कार्ले यांच्या निवडीने नगर तालुक्यातील शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.
संदेश कार्ले हे नगर तालुक्यातील खंडाळा येथील आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ठाकरे यांच्या शिवसेनेमधून झाली. संदेश कार्ले हे जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. तर नगर तालुका पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी पुरवठा योजनेचे ते तब्बल 10 वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. घोसपुरी पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष असतांना त्यांनी मायक्रो लेव्हलवर योजनेचा अभ्यास करुन तोट्यात असलेली योजना सुमारे दोन कोटी रुपयांनी नफ्यात आणली. योजना सुस्थितीत चालवून दाखविली. त्यामुळे घोसपुरी पाणी पुरवठा योजनेचा नावलौकिक राज्यात वाढविला होता. कार्ले यांच्या कामाची थेट राज्यपातळीवर दखल घेण्यात आली होती.
ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून ठाकरे शिवसेना नगर तालुक्यात घराघरात पोहोचविण्याचे त्यांनी काम केले. गावोगावी शाखा स्थापन केल्या होत्या. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविले. नगर तालुक्यात शिवसेना वाढीमध्ये कार्ले यांचा मोलाचा वाटा आहे. दरेवाडी व अरणगाव गटाचे कार्ले यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून त्यांनी नगर तालुका पिंजून काढत विविध योजना प्रत्येक वाडी वस्तीवर, शेतकर्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. नगर तालुक्यात जनमनातील चेहरा म्हणून आज संदेश कार्ले यांच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या वर्षभरापूर्वी कार्ले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. कार्ले यांच्या कामाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या गटाकडून जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी वर्णी लावत संदेश कार्ले यांच्या पाठिवर कौतुकाची थाप टाकली आहे. तसेच निवडीबद्दल भाजपचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी संदेश कार्ले यांचा सत्कार करत विश्वास दाखविला आहे. आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नगर तालुक्यात शिवसेना नेते संदेश कार्ले यांची भूमिका मोलाची ठरणार आहे. कार्ले यांच्यासोबत असणारे जिल्हा परिषद शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर, माजी उपसभापती डॉ दिलीप पवार, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, प्रकाश कुलट व इतर आक्रमक पदाधीकारी यांची फौंज पुढील निवडणुकीसाठी महत्वाची ठरणार आहे. प्रसंगी पक्षादेश व टीम वर्क याचा अनुभव सर्वांनी अनुभवला आहे. मागील लोकसभेला विखे यांच्याबरोबर तर आत्ता झालेल्या लोकसभेला लंके यांच्याबरोबर निष्ठने काम केले. विधानसभेला महाविकास आघाडीत शिवसैनिक व शिवसेनेच्या बाबतीत झालेल्या चुकीच्या निर्णयाबाबत कार्ले यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला होता.
एकंदरीतच कार्ले पक्ष निष्ठा पाळणारे आहेत. त्यामुळे आगामी काळात संदेश कार्ले यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संदेश कार्ले यांच्या उमेदवारीने झाला राणी लंके यांचा पराभव!
गत विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके रिंगणात होत्या. अपक्ष म्हणून शिवसेनेचे संदेश कार्ले रिंगणात होते. महाविकास आघाडीत पारनेरची जागा राष्ट्रवादीला गेल्याने नाराज होत संदेश कार्ले यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उडी घेतली होती. महाविकास आघाडीत असलेले कार्ले यांनी ऐनवेळी बंडखोरी केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांचा फटका राणी लंके यांना बसला. संदेश कार्ले यांनी 11 हजारांपेक्षा अधिक मते घेतली. निवडणुकीत महायुतीचे उमेदावर काशिनाथ दाते यांचा दीड हजार मतांच्या फरकाने विजय झाला. कार्ले यांच्या अपक्ष उमेदवारीनेच राणी लंके यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे तालुक्यात विखे-कार्ले सहमती एक्सप्रेस भविष्यात सुसाट धावू शकते. त्याचा महायुतीला फायदा होऊ शकतो असे राजकीय जाणकार सांगतात.


