अहिल्यानगर -शहरातील लालटाकी परिसरातील लक्ष्मीआई जत्रेमध्ये म्हशी पळवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत सहा जणाच्या टोळक्याने तीन युवकांवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भिंगार येथील गवळी वाडा परिसरात राहणारा अनिकेत गोरख बहिरट हा तरुण आपल्या भावासह आणि मित्रासह जत्रेत आला होता. तेथे संशयित आरोपी प्रणय जाधव, शेखर तांबे, रोहित शिंदे आणि सागर बारसे यांच्याशी त्यांचा किरकोळ वाद झाला. हा वाद मिटल्याचे भासवून आरोपींनी अनिकेत, त्याचा भाऊ आदित्य आणि मित्र पवन यांना चहा पिण्यासाठी बालिकाश्रम रोडवरील एका गोठ्यावर बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे हे तिघे तिथे गेले असता, संशयितांनी त्यांना घेराव घातला. ‘तुम्ही आमच्याशी वाद का घातला?’ असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी प्रणय जाधव आणि रोहित शिंदे यांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. तसेच आदित्य आणि पवन यांनाही लाथाबुक्क्यांनी आणि रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गोरडे करत आहेत.
नगर शहरातील लालटाकी परिसरात तीन युवकांवर जीवघेणा हल्ला
0
877
Related Articles
- Advertisement -


