महापालिका निवडणुका सुरू असतानाच राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठं विधान केलं. महापालिकांनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या झेडपी निवडणुका आधी होतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोरेगाव भीमा येथे बोलत होते.नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकासारखेच राज्यात दोन टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या पेचामुळे झेडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. पण त्याही दोन टप्प्यात होऊ शकतात. ५० टक्के आरक्षणाच्या आत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील. त्यानंतर उर्वरित झेडपीच्या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलेय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्या होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जातेय.
जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. निवडणुका जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या, अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे अजित पवार म्हणाले.सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेय. ६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील, असे समोर आलेय.


