Thursday, February 26, 2026

अहिल्यानगर मनपा निवडणुक ; पालकमंत्री विखे यांनी नाराज भाजप निष्ठावंतांच्या घरी जाऊन घेतल्या भेटी…

अहिल्यानगर : भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेत निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहननही त्यांनी या नाराजांना केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ची मोहीम सुरू केली आहे. काल, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेतही पालकमंत्री विखे यांनी जिल्ह्यात भाजपमध्ये नवा-जुना असा काही वाद नाही, जे काही वाद होते ते आम्ही एकत्र बसून मिटवले आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यानंतर पालकमंत्री नगरमध्येच थांबले.

त्यांनी रात्री शहरातील नाराज निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची घरी जाऊन भेट घेतली. या मोहिमेत भारतभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष कमलेश भंडारी, माजी संघटन सरचिटणीस सचिन पारखी, माजी मंडलध्यक्ष मयूर बोचूघोळ, संतोष गांधी आदींच्या घरी भेट दिली व चर्चा केली.यावेळी कमलेश भंडारी परिवाराच्या वतीने पोपटलाल भंडारी यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. केलेल्या कामाची पक्ष दखल घेणारच आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना ऐनवेळी काहींना डावलले गेले असेल तर त्यांनी नाराज न होता पक्षाच्या कामात व प्रचार यंत्रणेत सक्रिय व्हावे. निवडणुकीनंतर या सर्व निष्ठवंतांचे योग्य पुनर्वसन करू. स्वीकृत नगरसेवक, विविध महामंडळाचे प्रतिनिधित्व तसेच विविध समित्यांवर त्यांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न करू.

यावेळी कमलेश भंडारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहरातील दाळमंडई, अडते बाजार, कापड बाजार, नवीपेठ, बाजार समिती या मुख्य बाजारपेठेतील भागाला अद्याप प्रतिनिधित्व न मिळाल्याने बाजारपेठांचे व व्यापाऱ्यांचे वर्षानुवर्षाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर मंत्री विखे यांनी बाजारपेठेचे व व्यापाऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व नितीन दिनकर, हरजितसिंग वधवा, भारतभारतीचे अध्यक्ष रमेश रासने, किरण भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काबरा, बंटी गुंजाळ, संदीप तीपोले, अजित गुगळे, संजय पिपाडा, प्रशांत बोकारिया, अभय कटारिया आदी उपस्थित होते.अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. डॅमेज कंट्रोल मोहिमेला नाराज पदाधिकारी किती व कसे प्रतिसाद देतात, याकडे आता आगामी काळात लक्ष राहणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles