अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी धाराशिव इथं मोठा दावा केला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामुळे अजित पवार राष्ट्रवादीमधील कोणीतरी अनसिक्युअर होणार होतं, त्यांचे राजकारण असुरक्षित होणार होतं, असा हा दावा करत नीलेश लंके यांनी कोणाचेही नाव न घेतले नाही. यामुळे खळबळ उडाली आहे.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, “पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आम्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे गेलो. दोन्ही राष्ट्रवादीमधील उमेदवारांना निवडणुकीमध्ये त्यांना चॉईस चिन्ह दिलं गेलं. उमेदवाराला तुतारी किंवा घड्याळ, असे चॉईसने चिन्ह दिलं होतं. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अजितदादा बरोबर प्रचारात सक्रिय होतो. मी स्वतः, सुनील टिंगरे, रोहित पवार, सुनील शेळके आणि ताई (खासदार सुप्रिया सुळे) आम्ही एकत्रित प्रचार केला.” आताच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या चॉईसनुसारच बऱ्याच ठिकाणी चिन्ह दिलं आहे. कुणाला तुतारी पाहिजे, कुणाला घड्याळ पाहिजे, असं नियोजन करून चिन्ह वाटप केले होते. याचा अर्थ वरिष्ठ पातळीवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या होत्या, असे नीलेश लंके यांनी म्हटले.
‘सातारा भागामध्ये काल प्रचाराला होतो, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर तिथं काम करताना, आम्ही बरेच उमेदवार घड्याळ चिन्हावर दिले आहेत. खेड इथं देखील प्रचाराला होतो, तिथं देखील उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे होते. शिरूर इथलं उदाहरण देताना, अशोकबापू पवार हे विधानसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उभे होते. परंतु त्यांच्या पत्नी सुजाताभाभी आता घड्याळ पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ असा आहे की, वरिष्ठ लेव्हला बऱ्यापैकी गोष्टी ठरल्या होत्या,’ असा दावा नीलेश लंके यांनी केला आहे.
लंके म्हणाले, “प्रत्येकाचे राजकीय आराखडे वेगवेगळ्या असतात. पक्षाचे देखील राजकीय आराखडे असतात, राजकीय डावपेच असतात, राजकारणामध्ये नेतृत्व करणारे काही लोक ‘अनसिक्युअर’ असतात, आपण सुरक्षित राहू शकतो की नाही, आपण सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे, असे सुद्धा डावपेच असू शकतात.”


