आरटीओ कार्यालयातील अनागोंदीविरोधात छावा संघटनेचे आंदोलन
गैरहजर अधिकाऱ्याच्या खुर्चीला पुष्पहार घालून ‘गांधीगिरी’
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार, एजंटगिरी आणि अवजड वाहतूक अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजेरीविरोधात अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. कार्यालयात वेळेवर उपस्थित नसलेल्या खासगी अवजड वाहतूक अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून ‘गांधीगिरी’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, जिल्हाध्यक्ष योगेश वामन, धडक जनरल कामगार संघटनेचे श्रीधर शेलार, दत्ता वामन, सुभाष काकडे, गुलाब काकडे, मिलिंद कुलकर्णी, देवा, ॲड. मोनिका अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपांनुसार, अहिल्यानगर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील खासगी अवजड वाहतूक अधिकारी कधीच वेळेवर हजर राहत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत कार्यालयात एजंटांचा वावर वाढलेला असून, सामान्य नागरिकांना नियमांचे भय दाखवून कारवाई केली जाते, तर काहींना कथित हप्तेखोरीच्या माध्यमातून सुट दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी, तसेच कार्यालयातील अनागोंदी कारभार तात्काळ थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन परिवहन आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
शहरातील माळीवाडा पुणे बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्स व एजंटांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून, बसस्थानकातच प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचेही आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील अवजड वाहतूक हा देखील गंभीर प्रश्न बनला असून, यापूर्वी अवजड वाहनांच्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याचे आंदोलकांनी नमूद केले. तरीही संबंधित अधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने कारवाईत शिथिलता येत असल्याचा आरोप करण्यात आला. एजंटगिरी तात्काळ बंद करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि वाहतूक नियंत्रणाबाबत कडक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
आरटीओ कार्यालयातील गैरहजर अधिकाऱ्याच्या खुर्चीला पुष्पहार घालून ‘गांधीगिरी’

- Advertisement -

