अहिल्यानगर शहरात साईदीप रुग्णालयात राडा;नातेवाइकांची कर्मचाऱ्यांना मारहाण

साईदीप रुग्णालयात राडा; गोळीबारातील जखमींच्या नातेवाइकांची कर्मचाऱ्यांना मारहाण
​अहिल्यानगर: शहरातील साईदीप सह्याद्री रुग्णालयात गोळीबारात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी मोठा राडा केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्यासह वैद्यकीय कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी संजीव बन्सीलाल दायमा यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुरज सादु फुलमाळी आणि नितीन विलास सिरसाट हे दोघे गोळीबारात जखमी अवस्थेत रुग्णालयात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दोन्ही गटांच्या नातेवाइकांनी आपसात हाणामारी सुरू केली. मध्यस्थी करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आरोपी शाहरुख जावेद शेख, मयूर ठुबे, रवी आल्हाट, मदन जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी धक्काबुक्की व मारहाण केली. या गोंधळात जखमी नितीन सिरसाट याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सुरज फुलमाळी याच्यावर उपचार सुरू आहेत. तोफखाना पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दारूसाठी पैसे न दिल्याने मजुराला बेदम मारहाण; भोसले आखाडा परिसरातील घटना
​अहिल्यानगर: शहरातील भोसले आखाडा परिसरात एका वृद्ध मजुराला दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब खंडू दाभाडे (वय ६५, रा. मनाबाई चाळ, भोसले आखाडा) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दाभाडे हे बुरुडगाव रोडवरील लक्ष्मी आई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते मंदिरासमोरील ओट्यावर बसले असताना, त्यांच्या ओळखीचा आरोपी पिंश्या घोडके (रा. सातपुते गल्ली) त्या ठिकाणी आला. त्याने दाभाडे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

​दाभाडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू नको असे म्हटल्याचा राग मनात धरून आरोपीने दाभाडे यांच्या गालावर चापट मारली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, आरोपीने जमिनीवर असलेला दगड उचलून दाभाडे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला जोराने मारला. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवून गंभीर जखमी केले. दाभाडे यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

​या घटनेनंतर जखमी भाऊसाहेब दाभाडे यांनी आपला भाऊ मच्छिंद्र दाभाडे यास बोलावून घेतले. त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीत त्यांच्या डोळ्याच्या बाजूला जखम झाली असून पाठीला आणि खांद्याला मुका मार लागला आहे. याप्रकरणी फिर्यादी भाऊसाहेब दाभाडे यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी पिंश्या घोडके याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles