Thursday, February 19, 2026

पाथर्डी तालुक्यात 19 वर्षीय तरुणीचे अपहरण ; दोघांविरुद्ध गुन्हा

पाथर्डी-तालुक्यातील तिसगाव येथून शुक्रवारी (दि.14) 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका तासात तरुणीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणातील आरोपी मात्र फरार झाले असून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी तिसगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी संबंधित तरुणी तिसगाव येथील एका ब्युटीपार्लरमध्ये आली होती. ती बाहेर पडताच स्कॉर्पिओ गाडीतून दोन महिला व एक पुरुष आरोपी खाली उतरले. त्यांनी तरुणीला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवले. या वाहनाच्या मागे आणखी एक चारचाकी वाहन असल्याची माहिती साक्षीदारांनी दिली. काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी संबंधित मुलगी मनोरुग्ण असल्याचे सांगून तिला जबरदस्तीने घेऊन जात पळ काढला. आरोपींनी तरुणीचा मोबाईल बंद करून तिला वाहनाच्या मागील बाजूस बांधून ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मुलगी घरी परतली नसल्याने पालकांनी शोधाशोध केली असता अपहरणाची घटना उघडकीस आली. त्यांनी तत्काळ पाथर्डी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तातडीने तीन पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली तसेच अहिल्यानगर व पुणे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळासाठी तरुणीचा मोबाईल सुरू झाल्याने आरोपी पुण्याच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे पोलिसांना सतर्क करण्यात आले. शिक्रापूर येथे पोलिसांनी सापळा रचला. मात्र आपल्या मागावर पोलीस असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तरुणीला चाकण चौकात सोडून पळ काढला. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी तरुणीला ताब्यात घेत सुरक्षित केले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक पुजारी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, लक्ष्मण पवार, अक्षय वडदे, सागर बुधवंत, बाबासाहेब बडे आणि ज्ञानेश्वर इलक यांनी सहभाग घेतला. दरम्यान, मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून राणी सरोदे (रा. निवडुंगे) व अन्य दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles