तोतया पोलीस निरीक्षक बनून 5 लाखांची खंडणी ; नगर सायबरची गडचिरोलीत थरारक कारवाई

अहिल्यानगर-पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सामान्य नागरिकांना अटक करण्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगर सायबर पोलिसांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात धाडसी कारवाई करत मुख्य संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. चंदन दिगूराम सांगळे (वय 30, रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो अभियांत्रिकी शिक्षित असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात खंडणी, माहिती तंत्रज्ञान कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फिर्यादीला आरोपीने स्वतःची ओळख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील अशी करून दिली. तुमच्याविरोधात गंभीर तक्रार आली आहे. अटक टाळायची असेल तर 5 लाख रुपये तत्काळ द्या, अशी धमकी देत आरोपीने भीतीचे वातावरण निर्माण केले. कुटुंबीयांनाही अटक करण्याची भाषा वापरून आरोपीने फिर्यादीला मानसिकदृष्ट्या घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने कॉल डिटेल्स, आयपी लॉग्स व डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण केले.

तपासादरम्यान आरोपीचा माग गडचिरोली जिल्ह्यात लागला. पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथक तात्काळ गडचिरोलीकडे रवाना झाले. आष्टी (ता. चामोर्शी) परिसरात पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने आपल्या स्विफ्ट कारने पळ काढण्याचा प्रयत्न केला.नक्षलग्रस्त आणि दुर्गम परिसर असूनही पोलिसांनी धाडस दाखवत आरोपीचा पाठलाग केला. स्थानिक आष्टी पोलीस ठाणे यांच्या पथकाच्या मदतीने आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात यश आले. या कारवाईदरम्यान आरोपीकडील गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

उच्चशिक्षित; राज्यभर गुन्हे
अटक करण्यात आलेला चंदन सांगळे हा बी.ई. (इंजिनिअरिंग) शिक्षित असून आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करत होता. इंटरनेटच्या माध्यमातून विविध होस्टेल चालक, लॉज मालक व व्यावसायिकांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांना लक्ष्य केले जात होते. त्याच्याविरुद्ध यापूर्वी रत्नागिरी तसेच गोंदिया जिल्ह्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles