टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भाने केलेल्या विधानावर राज्यभरात भारतीय जनता पक्षाने केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही, मी तुलना केलेली नाही. पण सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. तरीही ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सपकाळ म्हणाले.
आयबीएन 18 मराठी वृत्तवाहिनीने सदर वृत्त दिले आहे
सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला.
सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.


