आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.तसेच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
भाजपकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत. यापैकी एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर इतर तीन उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपच्या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होईल. या तीन उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.


